स्थैर्य, अमरावती, दि.१७: औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस समोरा-समोर आलेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला.
काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल, अशी टीका शिवसेनेने सामनातून केली होती. त्याला उत्तर देताना सोशल मीडियावरील पोस्टद्वारे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘आम्ही काँग्रेस म्हणून मविआच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहो. काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही. आपली मते वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल,’ असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.
बाळासाहेब थोरातांची नामांतरावर स्पष्ट भूमिका
बाळासाहेब थोरात आपल्या पोस्टमध्ये म्हतात की, ‘औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील 5 वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’
‘गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे.’
शिवसेनेला मतांची चिंता
या पोस्टमधून बाळासाहेब थोरातांनी आपला मित्र पक्ष शिवसेनेवरही निशाना साधला. ते म्हणाले, “राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही. कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,’ असेही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.