दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | सातारा | देशातील केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केविलवाणी करुन टाकली ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी सातारा येथे हॉटेल प्राईडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी, इंधन दरवाढ, लॉकडाऊन, महागाई त्याचबरोबर अन्य विषयांवर पत्रकारांसमोर विवेचन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभारावर सडकून टीका करत असतानाच मोदींच्या ‘लसोत्सवा’वरही जोरादर टीका केली. भारतात मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाला असल्याचा दावा मोदींनी केला असलातरी जगात आपला क्रमांक 144 वा आहे. याचाच अर्थ भारताच्यापुढे अजून 143 राष्ट्र आहेत. ही बाब सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवी, अशी कोपरखळीही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी मारली.
ते म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून त्यांच्या विरोधात लोक बोलत आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढ करुन लोकांच्या गोरगरिबांच्या खिशातून 23 लाख कोटी गोळा केले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाला आल्यानंतर मोदी सरकार पॅनिक झाले. यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली आहे.
यावेळी बाबुराव शिंदे, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस ऍड. दत्तात्रय धनवडे, मनोजकुमार तपासे, मलकापूरचे मनोहर शिंदे, झाकीर पठाण, अन्वरपाशा खान, अमित जाधव, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेलचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी पाच वर्षे टिकणारच
महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आली असून सरकार पडावे म्हणून भाजपने अनेक प्रयत्न केले मात्र, त्यात यश आले नसल्याचा दावा करुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तीन पक्षाच्या सरकारला दोन महिने झाले की पडेल, वर्षांनंतर पडेल, आज पडेल, उदद्या पडेल अशी वल्गना, भाकित भाजपकडून केले जात होते. आता त्यांनी आमचा नाद सोडून दिला आहे. कारण सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे यात कोणतीही शकां नाही, असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठामपणे सांगून टाकले.