आषाढी वारीचे दिंडी अनुदान 1100 दिंड्यांच्या खात्यावर जमा

विठ्ठल महाराज पाटील ; शासन 2000 दिंड्यांना देणार अनुदान


दैनिक स्थैर्य । 27 जून 2025 । लोणंद । गतवर्षी प्रमाणे आषाढी वारीत सहभागी झालेल्या व राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्या सोबत चालणार्‍या दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज अखेर 1100 दिंड्यांच्या खात्यावर 2 कोटी 20 लाख रुपये जमा केले असून हे अनुदान राज्यातील 2 हजार दिंड्यांना देण्याचे त्यांचे नियोजन असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील यांनी दिली.

विठ्ठल पाटील म्हणाले, वारकरी साहित्य परिषद सन 2011 पासून राज्याच्या विविध भागात साहित्य परिषद घेवून संत साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत परिषदेमार्फत राज्याच्या विविध भागात मान्यवरांच्या उपस्थितीत 14 वारकरी साहित्य संमेलने भरविण्यात आली . त्याला वारकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे वारकरी दिंड्यांना मदत देण्याविषयी मागणी करण्यात येत होती. गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणार्‍या प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये इतके अनुदान देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण 1 हजार 109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकर्‍यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले होते. यंदा प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले आहे.

ना. संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभाग व विशेष साहाय्य यांचे वतीने विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून तात्काळ राज्यातील मानाच्या दहा पालख्या सोबत चालणार्‍या 1100 दिंड्यांना आज अखेर 2 कोटी 20 लाख रुपये निधी सुपूर्द केला आहे . आत्ता आणखी 400 दिंडी प्रमुखांच्या खात्यावर निधी पाठविला जाणार आहे व इतर 500 दिंड्यांची माहिती घेऊन निधी देण्याचे नियोजन आहे . त्यां दिंड्यांची माहिती प्राप्त होताच त्या दिंडी प्रमुखांच्या खात्यावर तात्काळ निधी जमा केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले .

अनुदानाचा दिंड्यांना फायदा

शासनाने गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी राज्यातील दिंड्यांना अनुदान देवून मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे . हे अनुदान दिंडी प्रमुखांच्या खात्यावर जमा झाले आहे . शासन राज्यातील 2000 दिंड्यांना अनुदान देणार असल्याचे समजले ही आनंदाची बाब आहे.
– माधव महाराज शिवनीकर, (वारकरी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष)


Back to top button
Don`t copy text!