‘आरोग्य अन् रोजगार’चा ‘निंबळक पॅटर्न’! राम निंबाळकरांचा स्तुत्य उपक्रम; डॉ. संयुक्ताराजे खर्डेकरांनी महिलांना दिला ‘यशाचा’ मंत्र


निंबळकच्या सर्वांगीण विकासानंतर उद्योजक राम निंबाळकर यांनी आता महिला सक्षमीकरणाचा वसा घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य शिबिरात डॉ. सौ. संयुक्ताराजे खर्डेकर यांनी महिलांना आरोग्य व उद्योजकतेचे धडे गिरवून दिले.

स्थैर्य, निंबळक, दि. ०६ जानेवारी : निंबळक गावातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि एकूणच पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलल्यानंतर, उद्योजक राम निंबाळकर यांनी आता आपला मोर्चा ‘महिला सक्षमीकरणा’कडे वळवला आहे. त्यांच्या संकल्पनेतून निंबळक ग्रामपंचायतीच्या उदयसिंह निंबाळकर सभागृहात आयोजित ‘महिला आरोग्य जागरूकता आणि उद्योजकता मार्गदर्शन’ शिबिराला महिलांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. श्रीमंत सौ. संयुक्ताराजे खर्डेकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासोबतच उद्योग क्षेत्रात भरारी घेण्याचा कानमंत्र दिला.

गावाच्या विकासात आणि गरजूंना रोजगार मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राम निंबाळकर यांनी महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे, यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते.

आरोग्य आणि स्वावलंबनाची शिकवण

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सौ. संयुक्ताराजे खर्डेकर म्हणाल्या, “ग्रामीण भागातील महिलांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून न पडता स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. बदलत्या जीवनशैलीनुसार नियमित आरोग्य तपासणी करणे काळाची गरज आहे.” आरोग्यासोबतच त्यांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्गही दाखवला. “महिलांनी केवळ घरकामात मर्यादित न राहता स्थानिक संसाधनांचा वापर करून छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत. यासाठी शासनाच्या विविध योजना आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध आहेत,” असे सांगत त्यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला.

राम निंबाळकरांच्या दातृत्त्वाचा गौरव

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सौ. सीमा बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिबिराचा उद्देश स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, “उद्योजक राम निंबाळकर यांचे निंबळक आणि पंचक्रोशीच्या विकासाकडे बारकाईने लक्ष असते. शासकीय योजनांसोबतच त्यांनी स्वतःच्या निधीतून गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. आता महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच दिशादर्शक ठरेल.”

आगामी काळात निंबळक व परिसरातील महिलांनी उद्योग व्यवसायात पदार्पण केल्यास त्यांना आवश्यक ती सर्व मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

या शिबिरास उपसरपंच सौ. गौरी ढमाळ, माजी उपसरपंच सौ. जयश्री मोरे, माजी सरपंच सौ. मोहिनी मतकर, सौ. संगिता निंबाळकर, श्रीमती लक्ष्मीबाई कापसे, सौ. मंदाकिनी निंबाळकर, माजी उपसरपंच सौ. मंगल जाधव यांच्यासह विविध महिला पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!