दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आरडगाव (ता. फलटण) येथील संपूर्ण महाराष्ट्राच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत वाघेश्वरी देवीची यात्रा शनिवार (दि. २४ ) व रविवार (दि. २५ ) अशी दोन दिवस आहे.
आरडगाव हे गाव डोंगरपायथ्याशी वसलेले आहे. याच डोंगरमाथ्यावर ग्रामदैवत वाघेश्वरी देवीचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने लाखो भाविक यात्रेवेळी दर्शनासाठी महाराष्ट्रातून येत असतात. येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा असते. वर्षभर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेदिवशी अनेक भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. शनिवार (दि. २४ ) रोजी यात्रेचा पहिला दिवस आहे.
प्रतिवर्षी माही पौर्णिमेला देवीचा अभिषेक घालण्यात येतो. दूध, दही, पंचामृत, मध, शिकेकाईच्या गरम पाण्याने देवीस स्नान घातले जाते. यानंतर देवीला लाकडी प्रतिकृतीच्या वाघावर बसवले जाते. त्या दिवशी दिवसभर भाविक भक्तांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. रात्री ११ नंतर देवीची पालखी वाजत गाजत गावात आणली जाते व सर्वजण देवीचे दर्शन घेतात. यात्रेच्या दुसर्या दिवशी कला रसिकांच्या मनोरंजनासाठी कोल्हापूरच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन केले जाते व सकाळी १२ वाजता भिल्लांचे सोंग काढले जाते.