स्थैर्य, दि २३: आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. दरम्यान गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज 23 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असणार आहे. राज्यातील महत्त्वाचे नेते आज दीर्घकाळानंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा मुंबईत उभारला जाणारा पहिलाच भव्य पुतळा असणार आहे. नऊ फूट उंच व 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती केलेली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. तसेच प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी केली गेली आहे. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपणही केले जाणार आहे.
मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा असायला हवा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेने मांडला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्येच मतभेत होते. या चर्चे दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. मात्र हा प्रस्तावही पास होऊ शकला नाही. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारला जाणार आहे. पालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.