दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । मुंबई । श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साजरा करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने आखला असून त्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला जात आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.
प्रा. शिंदे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव आजवर सर्व पक्ष, संघटनांच्या मार्फत एकत्रित केला जातो आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर स्थानिक आयोजन समित्या स्थापन केल्या जात असत. या समित्यांत सर्व पक्षाच्या, सर्व विचारांच्या कार्यकर्त्यांना, विविध संघटनांना प्रतिनिधित्व दिले जात असे. जयंती उत्सव कोणा एका पक्षामार्फत नाही तर सर्वामार्फत साजरा व्हावा असा हेतू यामागे आहे. मात्र यावर्षीची २९७ वी जयंती साजरी करताना या उत्सवात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राजकारण घुसडले.
यावर्षीचा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य अथवा स्थानिक स्तरावर कोणतीही बैठक न घेता राष्ट्रवादी नेतृत्वाने स्थानिक प्रशासनावर दबाव आणला. त्यामुळे प्रशासनाने जयंतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या समाज बांधवांना महाप्रसाद देण्यातही आडकाठी केली गेली आहे. जयंती उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे झळकत आहेत, झेंडे फडकत आहेत. यातून हा जयंती उत्सव राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसते आहे. आजवर या जयंती उत्सवाकडे लक्ष न देणाऱ्या पवार कुटुंबीयांनी अचानक यावर्षी या जयंतीच्या आयोजनात रस घेऊन त्याला पक्षीय रूप दिले आहे, असेही प्रा. शिंदे यांनी नमूद केले.