बॉलिवूडमधून एक दुःख बातमी येतेय. राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरच्या इनलाक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रणधीर कपूर यांनी दिला वृत्ताला दुजोरा
रणधीर कपूर यांनी एका न्यूज वेबसाइटसोबत बोलताना म्हटले, “मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय.” नीतू कपूर यांनीही सोशल मीडियावर राजीव यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राजीव यांना मिळाली होती ओळख
राजीव कपूर यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘एक जान हैं हम’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, परंतु त्यांना खरी ओळख 1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे मिळाली. राजीव ‘नाग नागिन’, ‘अंगारे’ यासारख्या चित्रपटात अभिनेता म्हणून झळकले. या व्यतिरिक्त त्यांनी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय स्टारर ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचे राजीव दिग्दर्शक होते.
7 महिन्यांपूर्वीच झाले ऋषी कपूर यांचे निधन
राजीव यांचे मोठे भाऊ ऋषी कपूर यांचे 7 महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. ऋषी यांनी दोन वर्षे कर्करोगाशी लढा दिला होता. अखेर 30 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.