
स्थैर्य, सातारा, दि.25 ऑक्टोबर : जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मिळालेल्या सहा कोटींमध्ये माण-खटावला सर्वाधिक मदत मिळाली आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण असणार्या पाटण तालुक्यात केवळ तीनच शेतकर्यांची नुकसान नोंद असून, नुकसान भरपाईत पाटणला ठेंगा मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पाटण तहसील कार्यालयासमोर चटणी- भाकरी आंदोलन करून काळीदिवाळी साजरी करणार आहेत.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील माणला चार कोटी, तर खटावला एक कोटी जाहीर झाले आहेत. त्यापाठोपाठ कोरेगाव, कर्हाड व पाटणला आहे. त्यामुळे पाटण तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा, यासाठी प्रयत्न करणारे नेते तसेच पालकमंत्रिपद असूनही तालुक्याला नुकसान भरपाईत सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात ते काय भूमिका घेणार? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
13 मेपासून सप्टेंबरअखेर पडलेल्या पावसामुळे सुमारे 70 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र पाटण तालुक्यात पेरणीविनाच राहिले. खरीप हंगामाबरोबर रब्बीही वाया जाण्याच्या मार्गावर असताना जिथे पेरणीच झाली नाही, ते नुकसान नाही का? अखंड तालुक्यात केवळ तीनच शेतकरी बाधित कसे? हे पंचनामे कधी व कोणते निकष लावून केले, याचा खुलासा करावा, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
शेतकर्यांना यावर्षी पेरणीच करता आली नाही. सुमारे 70 टक्के क्षेत्र पेरणीविना राहिले. शासन निकषानुसार पेरणी न झालेल्या क्षेत्राचा साधा पंचनामाही झाला नाही. याबाबत वारंवार पालकमंत्री व तहसीलदारांना निवेदने देऊन कल्पना दिली आहे. शासनाकडून कोणत्याही उपाययोजना न केल्याने त्याचा निषेध म्हणून पाटण तहसील कार्यालयासमोर चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी करून प्रशासनाचा निषेध करत आहोत.
प्रशांत पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना किसान मंच, पाटण

