दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
भाडळी बुद्रुक, ता. फलटण येथील जि. प. शाळेचे सन २०२३-२४ यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद केंद्रशाळा दुधेबावीचे केंद्रप्रमुख तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमप्रसंगी गावातील महिलांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुणांनी विशेष योगदान दिले.
यावेळी भाडळी बुद्रुक ग्रामपंचायत, मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी बुद्रुक, शालेय व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी, दुधेबावी केंद्रातील शिक्षक, शिक्षिका, शाळेचे माजी शिक्षक, ग्रामस्थ, महिला तरुण वर्ग उपस्थित होते.
स्नेहसंमेलनास उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी शाळेचे शिक्षक सुनील खरात आणि अमित जाधव आणि अंगणवाडी विभागाच्या सौ. माने मॅडम यांचे विशेष कौतुक केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुनील खरात आणि बाळकृष्ण मोरे यांनी केले. स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी सावंत आणि सहकार्यांनी केले तर अमित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.