दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता करून गायीचे दूध काढण्याचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना दिले.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी स्वच्छतेचा अवलंब करून गायीचे दूध काढण्याचे प्रात्यक्षिक दिले. त्याअंतर्गत त्यांनी गायीची धार काढण्यापूर्वी स्वच्छतेसंबंधी घ्यावयाची काळजी सविस्तर शेतकर्यांना सांगितली. या माहितीअंतर्गत त्यांनी गायीची धार काढण्यापूर्वी गायीचा कासेचा भाग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा, गायीचा पाठीमागचा भाग की जो मलमूत्राने भरतो, तो धार काढण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवावा, हाताने धार काढण्यासाठी जे पात्र वापरतो तेही स्वच्छ असावे, जर मशीनने धार काढत असाल तर मशीन वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावी, असे सांगितले. या माहितीचे कृषीकन्यांनी प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखवले. शेतकर्यांनी या प्रात्यक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.